केज किसान दि.१५
उच्चशिक्षीत असलेल्या दिवंगत डॉ विमलताई मुंदडा यांचा कुठलाही निर्णय हा अगदी ठामपणे घेत. अनुसूचित जाती मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असल्या तरी त्या राजकीय दृष्ट्या कधीच कुणा समोर झुकल्या नाहीत. निर्णयात माघार कधीही न घेणाऱ्या दिवंगत विमलताई मुंदडा यांना राजकीय संघर्ष देखील त्यांच्या पाचवीला पुजलेला होता आणि तो त्यांनी न डगमगता केला . मात्र, वैयक्तिक पातळीवर त्या प्रेमळ स्वाभावाच्या होत्या. प्रत्येकाची विचारपूस करणे कुठलाही कार्यक्रम असो हजर राहणे ते त्यांच्या जन्मजात स्वभावातच होते प्रत्येकाला जवळ घेत आस्थेवाईकपणे चौकशी करून कामही करत. त्यामुळे त्यांच्यापासून कोणी दुरावत नसे.
ओन्ली विमल ही ओळख त्यांनी आपल्या स्वकृत्तावर तयार केली .
कुठलाही राजकीय वारसा नसताना बीड जिल्ह्यात ओन्ली विमल अशी ओळख निर्माण करणाऱ्या दिवंगत नेत्या आणि माजी मंत्री डॉ. विमल मुंदडा यांची आज दि.१५ ऑगस्ट रोजी जयंती आहे. सलग पाचवेळा विजय आणि तोही प्रत्येकवेळी प्रचंड अशा मताधिक्याने विजय मिळवण्यात त्यांचा संघर्ष महत्त्वाचा आहे त्याबरोबरच त्यांना त्यांचे पती नंदकिशोर मुंदडा यांनी दिलेली साथही मोलाची आहे.
जनतेच्या पाठिंब्यामुळे मतदारसंघाचे सलग ५ वेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी मोजक्या नेत्यांनाच मिळते. त्यात विमलताई मुंदडा हे नाव बीड जिल्ह्यात घेतले जाते बीड जिल्ह्यात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर जनेतेचे पाठबळ मिळवण्याची कामगीरी आतापर्यंत केवळ दिवंगत लोकनेत्या डॉ. विमलताई मुंदडा यांना करता आली आहे .
सर्व सामान्य कुटुंबातून जन्मलेल्या विमलताई यांचे शिक्षण हे ग्रामीण भागातूनच झाले आहे त्यांनतर त्यांनी वैद्यकीय एम. बी. बी. एस. शिक्षण अंबाजोगाईत झाले. अंबाजोगाई येथील नंदकिशोर मुंदडा यांच्याशी त्या विवाहबध्द झाल्यानंतर त्या राजकारणात आल्या. केज मतदारसंघातून त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमधून १९९० साली पहिली निवडणूक लढविली. पहिल्या निवडणुकीत प्रंचड मतांनी विजयी झालेल्या दिवंगत विमलताईंचा विजय त्यांच्या अखेरपर्यंत श्वासापर्यत कोणालाही रोखता आला नाही.
राजकारणात एकदा लोकांची मनं जिंकून त्यांच्या सुख दु:खात सहभागी झाल्यानंतर यश निश्चित मिळते असेच त्यांनी दाखवून दिले होते. अंत्यविधी, मुंज, लग्नकार्य अशा सुखदुःखांच्या प्रसंगाला जाण्याचा नवा पायंडाच त्यांनी पडला. पण, हे करत असताना त्यांनी मतदार संघात विकासाची गंगा अंखडपणे वाहत ठेवली १९९५ च्या निवडणूकीत भाजपकडून दुसऱ्या वेळी विजयी झाल्या नंतर विमलताई मुंदडा यांचे आणि नेतृत्वाचे अंतर पडले.
राज्यात पाहिल्यावेळी भाजप पक्ष सत्तेत असतानाही त्यांनी १९९८ मध्ये शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. मतदार संघातील वंजारी समाजातील मते हे भाजपाच्या बाजूने होती पण त्यांनी धोका आणि सत्तेतला पक्ष अशी दुहेरी रिस्क त्यांनी घेतली. पण, जनतेशी नाळ पक्की जोडली गेली असल्याने त्यांच्या विजयी मतांचा आकडा वाढलेलाच होता. पुढील दोन निवडणूकातही त्यांनी विजय मिळवत केज मतदार संघात ओन्ली विमल अशी स्वतंत्र ओळख त्यांनी निर्माण केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत असताना ९ वर्षे त्या कॅंबिनेट व राज्यमंत्री राहिल्या. प्रथम महिला व बालकल्याण राज्यमंत्री व त्यानंतर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य मंत्री म्हणून काम पाहिले. आपल्या काळात विविध योजनाही त्यांनी राबविल्या.
राजकारणात संघर्ष व सामाजिक योगदान असल्याशिवाय सर्वसमावेशक नेतृत्व घडू शकत नाही हे वास्तव आहे. दिवंगत विमलताई मुंदडा यांचे नेतृत्वही असेच घडले. अंबाजोगाईकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे जिल्हा निर्मिती हा होता. त्यासाठी जनता व स्थानिक नेत्यांसोबत विविध आंदोलने त्यांनी केली. परंतु यात त्यांना यश आले नाही.
मंत्री झाल्यावर मात्र त्यांनी जिल्हा निर्मितीसाठी लागणारी सर्व कार्यालये अंबाजोगाईत आणली. अपर जिल्हाधिकारी, अपर पोलिस अधिक्षक, भूसंपादन विभाग, उपप्रादेशिक परिवहन, ग्रामीण पोलिस ठाणे ही कार्यालये त्यांनी १० वर्षाच्या कालावधीत येथे सुरू केली. परंतु जिल्हा निर्मितीचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. त्यापूर्वीच आजारामुळे त्यांचे निधन झाले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी केलेल्या कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण केली होती. ती सतत जनतेच्या कायम स्मरणार्थ राहील हे मात्र नक्की